Home News ‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात रंगला खेळ पैठणीचा’; अंकिता सुभेदार ठरल्या मानाच्या पैठणीच्या...

‘श्री औदुंबर स्वामी मंदिरात रंगला खेळ पैठणीचा’; अंकिता सुभेदार ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी

0
3

पूर्वा गुटे, प्राजक्ता बांदेकर यांना सुवर्ण बक्षिसे; कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत महिलांचा उत्साह ओसंडून वाहिला

सावंतवाडी,दि.२६ : येथील प्रसिद्ध श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष सोहळ्यात अंकिता आशिष सुभेदार यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी आपल्या नावे केली. तर पूर्वा गुटे यांनी द्वितीय आणि प्राजक्ता बांदेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. विविध मनोरंजक खेळ, स्पर्धा आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संपूर्ण सोहळा अत्यंत जल्लोषात आणि उत्साही वातावरणात पार पडला.
या विशेष स्पर्धेत मानाची पैठणी जिंकणाऱ्या अंकिता सुभेदार यांच्यासह इतर विजेत्यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या पूर्वा गुटे यांना एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या प्राजक्ता बांदेकर यांना एक ग्रॅम सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय मोबाईलवर सर्वाधिक स्टेटस पाहिल्याबद्दल स्नेहा सावंत यांना एक ग्रॅम सोन्याचा हार प्रदान करण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सविता गावडे आणि स्वप्नाली घाटे यांना आकर्षक सिल्क साड्या बहाल करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी येथील निवृत्त महिला अधिकारी स्नेहल तळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी, चूल आणि मूल या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांना दैनंदिन दिनक्रमातून बाहेर पडून स्वतःसाठी आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. कुटुंबापुरत्या मर्यादित राहिलेल्या महिला वर्गाला अशा कार्यक्रमांतून वेगळा आनंद आणि मानसिक समाधान मिळते, असे सांगत त्यांनी श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले व सातत्याने असे उपक्रम राबविले जावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. या वेळी निवृत्त पोलीस अधिकारी राजा राणे, अदिती सावंत, पूजा धोत्रे आणि मनाली राऊत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अमोल टेंबकर, भुवन नाईक, आनंद काष्टे, हेमंत पांगम, सचिन मोरजकर, प्रशांत सावंत, ओम टेंबकर, राजा राणे, विराग मडकईकर, हर्ष जाधव, विनोद सावंत, रश्मी सावंत, आर्या टेंबकर, आराध्या मोरजकर, भारती नाईक, भगवान नाईक, हेमांगी माने, रंजना निर्मळ, रश्मी गोसावी, मनाली राऊत, अदिती सावंत, सुरेखा पवार, पूजा धोत्रे, नमिता गवस, स्नेहल तळेगावकर आणि संजना गाटे यांच्यासह भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here