सावंतवाडी, दि. १० : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात पंचायत समिती सावंतवाडी व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पंचायत समिती स्तरावर १७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम होणार आहेत.
ग्रामपंचायत स्तर – शिलाफलक – गावातील संस्मरणीय ठिकाणी (शाळा / ग्रामपंचायत इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकावर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून लिहिण्यात येणार आहेत. हा शिलाफलक कायमस्वरुपी उभारण्यात येणार आहे.
वसुधा वंदन – यामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यसैनिक वीरांना वंदन – ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या निवृत्तीवीरांचा (आर्मी पोलीस दल स्वातंत्र्यसैनिक) यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान करण्यात येणार आहे. पंचप्राण (शपथ घेणे) ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी महिला बचतगट, अशासकीय संस्था, शेतकरी मंडळे, युवक मंडळे व नागरिकांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील (शाळा / ग्रामपंचायत) या एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येईल. सहभागाचे आवाहन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे. १७ ऑगस्ट रोजी सर्व उपक्रम सावंतवाडी पंचायत समिती येथे होणार आहे.