सावंतवाडी मधील कवठणी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका……!

0
77

सावंतवाडी,दि.२८ : तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे रोजी सकाळी ७ च्या दरम्यान सावंतवाडी वन विभागाला कवठणी येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असलेबाबतची माहिती सरपंच अजित कवठणकर यांनी दिली होती.


त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली शीघ्र कृतीदल सदर बिबट्याच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला अंदाचे तीन वर्षे वयाचा नर बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. सदर बिबट्या पहाटेच्या दरम्यान भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असे अंदाजावरून दिसून आले. बिबट्या विहिरीत पाईपच्या सहाय्याने लोंबकळत तग धरून राहिला होता. सदर बिबट्याला सुखरूपरीत्या बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दोरीच्या सहाय्याने पिंजराखाली सोडताच तो बिबट्या पिंजऱ्यामध्ये शिरला. अशा प्रकारे यशस्वीरित्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून त्याची विहीरीतून सुटका करण्यात आली.
बिबट हा आपल्या जैवविविधतेतील सर्वेच्च भक्षक असून तो आपली जीवसृष्टी संतुलित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.
ही बचाव मोहिम उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल प्रताप कोळी, वनरक्षक आप्पासाहेब राठोड, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, महादेव गेजगे, धनंजय यादव, पडते भाऊ, कवठणी गावचे सरपंच श्री.अजित कवठणकर व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांचे मोलाचे सहकार्याने पार पाडण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here