सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘आकाशदर्शन’ या आगळावेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
186

आकाश दर्शनाचा विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी लुटला मनसोक्त आनंद…

सावंतवाडी,दि.२७ : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर, माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय तसेच सावंतवाडी येथील जिमखाना लाखेवस्तीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आकाशदर्शन’ या आगळावेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण येथील अभियंता तथा खगोलशास्त्राचे अभ्यासक मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनासाठी झालेल्या या आकाश दर्शनाचा विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
भूगोलाच्या पुस्तकात अवकाश दर्शनाचे महत्त्व सांगितलेले असते. ग्रह व त्यांचे उपग्रह, तारे, तारका समूह, धुमकेतू आदींची माहितीही या अभ्यासक्रमात आहे. मात्र पुस्तकातील लिखाणाच्या व चित्रांच्या आधारे आकाश समजून घेणे व प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने आकाशाचे अवलोकन करणे, यात मोठा फरक आहे. प्रत्यक्ष आकाश दर्शनाने विद्यार्थ्यांच्या खगोलशास्त्राच्या रुचीसह त्यांची जिज्ञासा वाढते. त्यामुळेच सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने आकाश दर्शन या असुन त्याच उद्देशाने आकाशदर्शन या माहिती प्रधान व प्रभोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ६ ते रात्री ११:३० पर्यंत असे सलग ३ दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदार माईणकर यांनी ग्रह व त्यांचे उपग्रह, नक्षत्र, राशी, तारका समूह, धूमकेतू, प्रकाश वर्ष, विविध प्रकारच्या दुर्बीण बाबत विषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना माहिती दिली. नासा व इतर अंतराळ स्थानकांनी अवकाशातून घेतलेल्या चित्रांच्या माध्यमातूनही त्यांनी आकाश समजावून सांगितले. तसेच दिवस-रात्र व ऋतू कसे होतात ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी मंदार माईणकर यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून शनी, गुरु, मंगळ व मंगळाच्या उपग्रहांचे दर्शन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांना करून दिले. त्याशिवाय आकाशाचा अभ्यास प्रत्यक्ष कसा करावा? आकाशाच्या सीमा कशा ओळखाव्यात? रात्रीच्या वेळी दिशादर्शन कसे करावे? ही सर्व माहिती त्यांनी प्रत्यक्षपणे सांगितली.
यावेळी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनीही सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचेही कौतुक केले. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने शालेय विद्यार्थ्यासाठी शब्दगंध, एक दिवस शाळा भेट, सायकल वाटप, स्कूल किट वाटप आदी शैक्षणिक विविधांगी उपक्रम सातत्याने राबविले जातात
यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे, सीए लक्ष्मण नाईक, दीपक गावकर, प्रकाश पाटील, रवी जाधव, सिद्देश मणेरीकर, भार्गवराम शिरोडकर, निलेश माणगांवकर तसेच दोन्ही प्रशालेतील मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शुभांगी चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर तसेच श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here