आरोस हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
सावंतवाडी,दि.०१: विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे.विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्याचे व वाढवण्याचे काम हे सांस्कृतिक कार्यक्रमातून केले जाते. अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलेचा वारसा जपून स्वतःचे कौशल्य विकसीत करावे. आताच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकापर्यंतच मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून कौशल्य विकसीत करावे, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आरोस येथे केले.
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन परब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष नारायण कामत तर प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर हे होते . यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, माजी नगरसेवक उमा वारंग , संस्थेचे उपाध्यक्ष संजय पांगम , हेमचंद्र सावळ, खजिनदार बाळा मोरजकर, सहसचिव सिद्देश नाईक, संस्था संचालक प्रमिला नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर शिवाजी साठे, रामदास नाईक, ज्ञानेश्वर परब आदी उपस्थित होते .