आगामी काळात कोकण ही महाराष्ट्राचे गेट वे असेल… विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

0
26

सिंधुदुर्ग प्रेस क्लबचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडीत संपन्न

सावंतवाडी,दि.१७ : देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील सर्वांत हाय प्रोफाईल मल्टी कल्चरल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान माझ्या सारख्या एका कोकणी माणसाला मिळाला हा तुमचा सन्मान आहे. कारण आम्ही कोकणी माणूस सर्वांना साथ देतो. माझ्या व माझ्या परिवाराच्या यशात सावंतवाडी व सिंधुदुर्गाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या कोकणच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असेन , येणाऱ्या काळात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल अधिकची गुंतवणूक येईल, असा विश्वास महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडीतील काझी शहाबुददीन हाॅलमध्ये विधानसभाध्यक्ष श्री. नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, अध्यक्ष अनंत जाधव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा कोकणी माणूस नेहमीच पुढे असतो. त्यामळे अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना मला कुठेच काटेरी मुकुट दिसला नाही तर दिसला तो स्वाभिमानी कोकणी बाणा व त्यामुळेच मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे योग्य व निरपेक्षपणे पार पाडली.

मी दिलेल्या निकालाच्या वेळी मला नेहमीच पत्रकारांनी योग्य व समर्थपणे साथ दिली. त्यामुळे पत्रकारांना माझी नेहमीच साथ राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी काळात कोकण ही महाराष्ट्राचे गेट वे असेल. कोकणात असलेली साधनसामुग्री पाहता पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यात कोकणाला सोनेरी दिवस प्राप्त होतील. आगामी काळात कोकणातून मुंबईत गेलेला कोकणी माणूस पुन्हा मुंबईतून कोकणात माघारी येईल. कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल. देशभरात विखरलेला कोकणी माणूस पुन्हा एकत्र कोकणात येऊन कोकणाच्या विकासाला चालना देईल.
कोकणच्या मातीत केवळ नैसर्गिक नाही तर सभ्यतेचं वरदानं लाभलं आहे. बॅ. नाथ पै पासून ही मालिका सुरु आहे.

कोकणचेच सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं गौरवशाली काम ऐतिहासिक ठरलं आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या कार्याचाही गौरव केला.
कोकण ही आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची भूमी आहे. त्यांनी पत्रकारितेचा जो वसा जपला आहे त्यांचा आदर्श जपत त्यांचा वारसा जतन करण्याचे काम आजचे कोकणातील पत्रकार नेहमीच करत आले आहेत. त्यामुळे मला कोकणातील पत्रकारांचा देखील नेहमीच आदर व सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोकणातील माझ्या पत्रकार बांधवांना निर्भिड पत्रकारीता करण्यासाठी माझी समर्थ साथ तुम्हाला नेहमीच राहील, असा विश्वास देखील त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी सावंतवाडीचे सुपुत्र अँड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून प्रेस क्लबच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आ. दीपक केसरकर म्हणाले, माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे यापुढेही पत्रकारांच्या हिताच्या सर्व गोष्टींसाठी माझे नेहमीच योगदान राहील, अशी ग्वाही माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
यावेळी सिंधुदुर्ग प्रेस क्लब भूषण पुरस्कार पत्रकार रूपेश हिराप यांना

तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया आदर्श पुरस्कार आनंद धोंड,

प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे

तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम

यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच दैनिक सकाळचे उपसंपादक शिवप्रसाद देसाई व कोकण लाईव्हचे संपादक सिताराम गावडे

यांचा यावेळी प्रेस क्लबतर्फे मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, युवा उद्योजक दिनेश गावडे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, पत्रकार रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, शिवप्रसाद देसाई, सचिन रेडकर, अमोल टेंबकर, विजय देसाई, राजू तावडे, दिव्या वायंगणकर, हेमंत खानोलकर,संदेश पाटील, राकेश परब, जय भोसले, मिलिंद धुरी, आनंद कांडरकर, शैलेश मयेकर, साबाजी परब, अनुजा कुडतरकर, निखिल माळकर, शुभम धुरी, महादेव भिसे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here