Site icon Kokandarshan

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्थानिक नाभिक बंधूभगिनींनी आपले व्यवसायातील स्थान अढळ करावे..

सावंतवाडी तालुका नाभिक संघटना आयोजित श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन

सावंतवाडी,दि.३१: येथील तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना सावंतवाडी यांच्या वतीने श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सावंतवाडी येथील बॅरिस्टर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून विशाल परब यांची उपस्थिती लाभली होती.

यावेळी बोलताना श्री परब म्हणाले की आज प्रत्येक व्यवसायात विविध आव्हानांचा सामना हा करावाच लागतो, नाभिक समाजाचा व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून सौंदर्य कला यांची उपासना आहे असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही. आपल्या या पारंपरिक व्यवसायात स्थानिक नाभिक बंधू-भगिनीनी आपले वर्चस्व व स्थान अबाधित ठेवले पाहिजे. या व्यवसायात विशेषतः महिला भगिनी यशस्वीपणे आव्हाने पेलत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. नाभिक समाजाच्या व्यवसायात आणि संघटनात्मक कामात काही अडचणी येत असतील तर मी आपणा सर्वांचा प्रामाणिक हितचिंतक म्हणून सदैव आपल्या पाठीशी आहे.

यावेळी नाभिक संघटनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, नाभिक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष सदानंद पवार, उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर, सेक्रेटरी श्रीकांत कोरगावकर, खजिनदार दयानंद वेंगुर्लेकर, नाभिक समाज शहराध्यक्ष सर्वेश्वर होडावडेकर, शहर उपाध्यक्ष चेतन तोरस्कर, युवा अध्यक्ष अक्षय चव्हाण,अजित होडावडेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.मराठे आदी मान्यवर या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.

श्री संत सेना महाराजांचे पूजन, आरती, भजन, तीर्थप्रसाद या धार्मिक कार्यक्रमांसह रक्तदान शिबिर, पाककला स्पर्धा, नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमांसह श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम ज्या अतिशय उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला गेला, त्याचे विशाल परब आणि सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अगत्यपूर्वक अशा सुंदर कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल विशाल परब यांनी सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version