सावंतवाडी,दि.२४: संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागरूकता आणि ऑलिंपिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन शेखर जैन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. यानंतर, शाळेच्या क्रीडाशिक्षिका श्रीमती धनश्री तुळसकर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या पटांगणावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, बॅडमिंटन आणि हॉलीबॉल या खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
खेळांप्रमाणेच, ऑलिंपिक खेळांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शाळेच्या डिजिटल क्लासरूममध्ये ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या विविध भारतीय खेळाडूंची माहिती देणारी एक माहितीपट (डॉक्युमेंटरी फिल्म) दाखविण्यात आली.
यामुळे विद्यार्थ्यांना ऑलिंपिकचा इतिहास, त्यातील भारतीय खेळाडूंचे योगदान आणि खेळांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
संस्कार नॅशनल स्कूलने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, सांघिक कार्य आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व रुजविण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.