Site icon Kokandarshan

ध्येय निश्चित करून शैक्षणिक वाटचाल केली तर अधिकारी व्हायची संधी प्राप्त होईल

स्पर्धा परीक्षेला परीक्षा मार्गदर्शन प्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण

सावंतवाडी,दि.०९: गुरूजन,आई वडील यांच्या योग्य मार्गदर्शनातून अंगाशी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे गुण अंगिकारले तर स्पर्धा परीक्षांत यश संपादन करून अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाऊ शकते. त्यासाठी सातत्य महत्वाचे आहे असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले.
माजगाव येथील शिक्षण सहाय्यक संस्थेच्या भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थीनी नेहा गोविंद कवडेकर (चराठा) ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ व संकल्प एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने सत्कार सोहळा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण सहाय्यक संस्था माजगाव मंडळाचे अध्यक्ष भास्कर कासार, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सौ माधुरी मुळीक, संस्थेचे सचिव सीए लक्ष्मण नाईक, उपाध्यक्ष नारायण कानसे, माजी विद्यार्थ्यांनी नेहा गोविंद कवडेकर, संकल्प एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, कोषाध्यक्ष अनंत जाधव, किशोर होडी, मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी नेहा गोविंद कवडेकर ही स्पर्धा परीक्षा पास होऊन बँकीग क्षेत्रात काम करत आहे त्याबद्दल पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सौ माधुरी मुळीक, संस्था अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सीए लक्ष्मण नाईक आदींनी संस्था व कर्मचारी वृंद यांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. तसेच राज्यस्तरीय शालेय पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत प्रथम आलेल्या हेमांगी गजानन मेस्त्री हीचे अभिनंदन केले.

पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात शालेय स्पर्धा, शिक्षण स्तरावर सातत्याने यश संपादन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले ध्येय निश्चित करून शैक्षणिक प्रवास केल्यावर योग्य दिशा मिळते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वाचन,मनन करत ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या वाटेने प्रवास केला पाहिजे. यासाठी चिंतन, मनन, जिज्ञासा अंगिकार केला पाहिजे.
उपनिरीक्षक सौ माधुरी मुळीक म्हणाल्या, इयत्ता पहिली पासून शिक्षण घेत असताना आपण सर्व विषयांवर प्रभुत्व मिळवले तर स्पर्धा परीक्षा सोपी जाते. जिद्द, चिकाटी आणि ध्येय ठेवून वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा आपण स्वतः शी करायला हवी. यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये धडपड सुरू ठेवली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत कमी प्रमाणात आहेत.ती संख्या वाढत गेली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी तशी स्वप्ने पहावीत.
सीए लक्ष्मण नाईक म्हणाले, आपल्या शाळेची मुलं प्रत्येक क्षेत्रात चमकत राहावी असे आमचे स्वप्न आहे. ते विद्यार्थ्यांनी साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत साकारत्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल केली तर तो आदर्श निर्माण होईल.
यावेळी संकल्प एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री लोंढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी अधिकारी व्हायला हवेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विद्यार्थी आणि आई वडील यांनी लक्षात घेतले पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी नेहा कवडेकर व किशोर होडी यांनी शिक्षण व आपलं करिअर निवडताना योग्य निर्णय घेतला पाहिजे. त्या दृष्टीने वाटचाल करताना आई वडील,गुरूजन व मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाचा आदर केला पाहिजे.
मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब चवरे यांनी प्रास्ताविक, तर सुत्रसंचलन प्राजक्ता गावडे व आभारप्रदर्शन चंद्रशेखर सावंत यांनी केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version