Site icon Kokandarshan

सावंतवाडी पोलिसांची केशवसुत कट्ट्यावर जेष्ठ नागरिकांशी चर्चा..

सावंतवाडीत होणारे अनुचित प्रकार थांबवा.. ज्येष्ठ नागरिकांची मागणी

सावंतवाडी,दि.२९ : शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. त्यामुळे वन-वे किंवा सम-विषम पार्किंग राबवून ठोस पर्याय निवडा, आणि वाढणारे अपघात तसेच पार्किंग मधील अनियमितता सुरळीत करा, अशी मागणी सावंतवाडी जेष्ठ नागरिकांकडून पोलिसांकडे करण्यात आली. दरम्यान शहरात गेले काही दिवस धूम स्टाईल वाहनधारकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कारवाई करुन हे प्रकार रोखा, काळ्या काचा लावून गाड्या चालविणार्‍यांवर कारवाई करा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून संवाद पंधरवडा अनुषंगाने येथील केशवसुत कट्ट्यावर जेष्ठ नागरिकांशी चर्चा केली यावेळी उपस्थित जेष्ठ नागरिकांना पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील आणि गणेश कराडकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पाटील म्हणाले, पंधरवड्याच्या निमित्ताने आम्ही जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहोत. त्या अंतर्गत संबंधितांना असलेल्या अडचणी, समस्या दुर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. त्या ऐकून पुढील भूमिका ठरविण्यासाठी आम्ही लोकांशी संपर्क साधत आहोत. त्यामुळे आपल्या अडचणी तसेच सूचना मांडाव्यात असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या सुचना मांडल्या. यावेळी केशवसुत कट्ट्यावर रात्रीच्या वेळी मद्य पिण्यासाठी काही जण बसलेले असतात तसेच तरुण-तरुणी उशिरा पर्यंत त्या ठिकाणी वाढदिवसाच्या पार्ट्या साजर्‍या करतात. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरात गस्त घालण्यात यावी, अनुचित प्रकार रोखावेत, काही अवैध धंदेवाईकांकडे लक्ष द्यावे.
यावेळी डॉ. मधुकर घारपुरे, प्रा. एम.व्ही. कुलकर्णी, प्रकाश मसुरकर, मुकुंद वझे, सुरेश म्हसकर, प्रदीप प्रियोळकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version