सावंतवाडी, दि.२८: शिरशिंगे गावची ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थानचा वार्षिक हरिनाम सप्ताह आज २८ रोजी रथ सप्तमी दिवशी प्रारंभ झाला.
हा सप्ताह सात दिवस चालतो, या सात दिवसात गावातील वातावरण भक्तिमय सागरात न्हाऊन गेलेले असते. हरी नामाचा गजर करत रात्रंदिवस अविरत पणे मंदिरात भजन चालू असते.
या दरम्यान पाचव्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या वाडींच्या दिंड्या पाहावयास मिळतात. यावेळी शाळेतील मुले विठ्ठल रखुमाई च्या वेशभूषा सह विविध संत मंडळींच्या वेशभूषा साकारतात.यावेळी येथील मंदिर परिसरात जणू पंढरपुरात असल्याचा भास होतो.
अशाप्रकारे सात दिवसात गावात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरलेले असते.