Site icon Kokandarshan

मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार.. केसरकर

सावंतवाडी,दि.१५: दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतला आहे. निवडणूकीत देखील मी कोकण विभागाची सेवा करणं अधिक आवडेल असं म्हंटले होते अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी दिली आहे. मंत्रीमंडळात वर्णी न लागल्याबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डी येथे साईबाबांच दर्शन घेतल. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. कोकण विभाग हा दुर्लक्षित राहिला आहे. मुंबईच्या जवळचे भाग विकसित झाले. मात्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडवी अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतला आहे. निवडणूकीत देखील मी कोकण विभागाची सेवा करण अधिक आवडेल असं म्हंटले होते. एकनाथ शिंदे हे फायटर नेते आहेत. चांगल्या योजना त्यांनी राज्यात राबविल्या. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. माझ्यावर अन्य कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का ? याची कल्पना नाही. आमदारांची भेट घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदाच भेट झाली. त्यानंतर अद्याप भेट झालेली नाही. शिक्षणविभागात क्रांतीकारी निर्णय मी घेतलेत. पुढील मंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मराठी भाषा विभागातही उल्लेखनीय कार्य केलं. मी केलेल्या कामाच समाधान आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. उद्या नागपूरला जाणार असून नवनिर्वाचित मंत्र्यांच अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत चांगलं यश महायुतीला मिळू देत अस साकड साईचरणी घातलं आहे. कोकणात विशेषत: सिंधुदुर्गात पर्यटनाची खूप संधी आहे. मात्र, त्या प्रमाणात पर्यटन तिथे आलं नाही. त्यासाठी अधिक मेहनत घेणार आहे. जिल्ह्याच दरडोई उत्पन्न सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. भविष्यात सर्वांगीण विकास झाल्यावर ते आणखीन वाढेल व पहिल्या क्रमांकावर येऊ शकत. साईबाबांची तशी इच्छा असेल अन् ते माझ्या हातून घडेल‌. निवडणूकीतील भाषणात मी कोकण विभागाची सेवा करण्याची संधी द्यावी असं सांगितलं होतं. मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार आहे.

Exit mobile version