Site icon Kokandarshan

लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान सेवा सुरळीत होणार..

…अखेर खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश

सिंधुदुर्ग,दि.२९: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवा सुरळीत होण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग विमानतळामुळे होणाऱ्या सेवांकडेही मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्गला सेवा देणारी अलायन्स एअर सेवेचे आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याबाबत स्पष्ट भुमिकाही मांडली. यावेळी ही सेवा लवकरच सुरु करण्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून कार्यवाही होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडू यांनी खा.नारायण राणे यांना दिले.
या भेटी दरम्यान खा. नारायण राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा मूळ समुद्रकिनारे, विपुल नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे आणि विदेशी खाद्यपदार्थांसह पर्यटकांचे देशव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय आवडते ठिकाण आहे. भारत सरकारने या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना आणी ‘उडान’मध्ये समाविष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळाची निवड केली. अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरूही केली. त्यांच्याशी झालेल्या कराराचा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे.
मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणी पर्यायाने कंपनीला होत असायचाच.हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तीकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान , तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.
पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी. अशी मागणीही खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version