मराठा समाजाने आपले बहुमुल्य मत वाया न घालवता योग्य उमेदवाराला मतदान करा
सावंतवाडी दि.१५: मराठा समाज प्रत्येक पक्षात विखुरलेला आहे किंबहुना पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे कोणाचीच मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सकल मराठा समाज बंधु भगिनींनो आपल्याला योग्य वाटेल, जो समाजाला न्याय देईल,अशा सक्षम उमेदवाराला मतदान करावे. मराठा समाज योग्य उमेदवाराला मतदान करत असल्याची परंपरा आहे, त्यामुळे योग्य उमेदवाराला मतदान करावे,असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाची भूमिका काय ?अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने हे स्पष्ट करावे लागत आहे.या मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवार मराठा समाजाचे आहेत तर इतर उमेदवार वेगळ्या प्रवर्गातील आहेत.त्यामुळे मराठा समाजा मध्ये गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा करावा लागत आहे असे श्री गावडे यांनी म्हटले आहे.
ज्या उमेदवाराला सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे,जो उमदेवार ते प्रश्न पोटतिडकीने सोडवेल,बेरोजगारांच्या हाताला काम देईल,व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नसेल,मतदारसंघातील शांतता अबाधित ठेवेल अशाच उमेदवाराला विचार पूर्वक मतदान करावे. सर्व उमेदवारांना ओळखता लोकशाहीत आपले मत अमुल्य आहे ते वाया घालवू नये असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.