सावंतवाडीत युवासेनेच्या सभेला उस्फुर्त प्रतिसाद
सावंतवाडी,दि.२३: खास.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा संवाद यात्रा राज्यात सुरू आहे. युवा ही एक ताकद असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यात युवकांचा सहभाग मोठा आहे. गोरगरिबांची जाण असलेला नेता, शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारा शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली. पण, काहीजण खोटा प्रचार करतात. त्यांच्या टीकेला, टीकेनं उत्तर न देता कामातून उत्तर देऊ असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
मंत्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासात्मक कामे आम्ही केली. मुलींना मोफत शिक्षण, विद्या वेतन योजना, परदेशात नोकरीची संधी देण्याच काम आमच्या महायुती सरकारने केले. जर्मनी भाषेच शिक्षण देऊन कोकणातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त करून दिली. कोकणाला निसर्गाच वरदान आहे. त्यामुळे या भागात विविध पर्यटन योजना आम्ही सुरू केल्यात. युवकांत शक्ती असते, त्यांना प्रोत्साहन दिलं. मात्र, काहीजण खोटा प्रचार करत असतात. युवकांना रोजगार देण्याच काम महायुती सरकारने केल. लाडकी बहीण योजना तळागाळापर्यंत पोहचवली. येथील आडाळी एमआयडीसीत ८४ उद्योगांची नोंद झाली आहे. प्रगतशील शेतकरी वर्गासाठी क्रांतिकारी योजना सरकारने सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे टीकेला, टीकेन उत्तर न देता कामातून उत्तर देऊ असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करत युवासैनिकांनी सिंधुदुर्गच्या विकासात योगदान द्यावं असे आवाहन केलं.
सावंतवाडी येथे युवा सैनिकांचा युवा संवाद मेळावा युवाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. यावेळी युवक-युवतींना नियुक्ती पत्रे युवासेना सचिव किरण साळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी श्री.साळी म्हणाले, युवाई एकत्र येते तेव्हा क्रांती होते. त्यामुळे चौथ्यांदा दीपक केसरकर आमदार म्हणून विधानसभेत भरघोस मतांनी निवडून येतील. दुसरीकडे, निलेश राणे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात येत असून हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देऊ असा विश्वास महाराष्ट्र युवासेना सचिव किरण साळी यांनी व्यक्त केला. उपस्थित युवा सैनिकांनी मनोगत व्यक्त करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना चौथ्यांदा निवडून आणण्याचा निर्धार केला.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, युवा सेना सचिव किरण साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रेमानंद देसाई, किसन मांजरेकर, नितीन मांजरेकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, देव्या सुर्याजी, राहुल अवकाडे, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, वर्धन पोकळे, सौ. सौदागर, सोनाली पाटकर, बाळा दळवी, संदीप निवळे, शुभम बिद्रे, देवेश पडते, रोहित पोकळे, अकबर सय्यद,ऋत्विक सामंत, मेहूल धुमाळ आदींसह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.