Site icon Kokandarshan

फिरत्या दवाखान्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन… मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी,दि.२७ : मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती होती. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमासाठी सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रवीण ठाकरे यांचे कौतुक केले. फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा गावात उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले.

सावंतवाडीत राजवाडा येथे “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, योग विद्या प्राणिक हिलिंगच्या प्रशिक्षिका शुभा धामापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. फिरत्या दवाखान्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहेत. ठाकरे हे संघाचे स्वयंसेवक आहेत.त्यामुळे त्यांच्या अंगात सामाजिक बांधिलकी भिनलेली आहे. शासकीय महाविद्यालय सिंधुदुर्गात होण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. परंतु, मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविद्यालयाचे काम थांबले होते. परंतु, आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली व ते पूर्णत्वास आल्याची भावना श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली‌.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधू सेवा सहयोग प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याच वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची सेवा केली जाणार असून पुण्याचं काम प्रतिष्ठान करत आहेत. गोरगरिब, गरजूंचे आशीर्वाद आपल्या मागे आहेत. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे निश्चितच आरोग्य क्षेत्रात बळकटी मिळेल व जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल असं प्रतिपादन श्री‌. केसरकर यांनी केलं.

प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ. प्रविण कुमार ठाकरे म्हणाले, सिंधुमित्र प्रतिष्ठानने स्थापनेपासुनच विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषय विविध उपक्रम सातत्याने राबवून जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहे. याच प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली ओटवणे दशक्रोशीतील दहा गावांमध्ये गेले दीड वर्ष फिरता दवाखाना कार्यरत आहे. याच समाजसेवेतील पुढचे पाऊल म्हणुन फिरते वैद्यकीय पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकामार्फत दाणोली पंचक्रोशीतील फणसवडे, केसरी, दाणोली गावठण, पारपोली, देवसू, ओवळीये या गावांसह आंबेगाव, कुणकेरी या दुर्गम भागात डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा फिरता दवाखाना या गावात जाणार आहे. राजवाडा येथील लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधूमित्र सेवा सहयोगचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष लवु म्हाडेश्वर, योग विद्या प्राणिक हिलिंगच्या प्रशिक्षिका शोभा धामापुरकर, फिरत्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख दीपक गावकर, माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर, उदय नाईक, प्रमोद गावडे, मंदार कल्याणकर, म.ल.देसाई, प्रमोद सावंत, चंद्रकांत जाधव, रेलिंग फाउंडेशनचे विवेक दोषी, गुरुप्रसाद राऊळ, नंदू शिरोडकर, संजय लाड, विनय वाडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राहुल गव्हाणकर तर आभार गुरुनाथ राऊळ यांनी मानले.

Exit mobile version