सावंतवाडी,दि.२९ : शहरातील बाजारपेठेत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,अन्यथा गवत मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर आणून बसवणार असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत श्री परब यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या उपस्थितीत बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांच्या समस्या बाबत भेट घेत पाहणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी बाजारपेठे मधील नगरपालिकेच्या गवत मार्केटमध्ये भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने संजू परब यांचे लक्ष वेधत शहरात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे गवत मार्केट मधील भाजी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे सांगितले होते. रस्त्यावर भाजी विकत मिळत असल्याने मार्केटमध्ये कोणीही ग्राहक येत नाही त्यामुळे आम्हाला व्यवसाय नाही त्यामुळे रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांवर आळा घाला असे मागणी त्यांनी केली होती एकूणच या मागणीचा विचार करत संजू परब यांनी आज गवत मार्केट मधील व्यापाऱ्यांची भेट घेतली व वस्तुस्थिती जाणून घेतली यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना बोलावून घेत रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना उद्यापासून बाजूला करा अन्यथा हा गवत मार्केट मधील व्यापाऱ्यांना आपण रस्त्यावर आणून भाजी विक्री करण्यास लावू असा इशारा दिला त्यावेळी साळुंखे यांनी रस्त्यावरील व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन श्री परब यांना दिले.
तर संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी टाकण्यात आलेली पाईपलाईन व्यापाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे याबाबतही संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले व्यापाऱ्यांच्या असलेल्या समस्या तात्काळ दूर करा असेही परब यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजी विक्रेते अजित वारंग, सागर मटकर, गणेश कुडव, मंदार पिळणकर आदी माजी व्यवसायिक उपस्थित होते.