सावंतवाडी,दि.२०: सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. आपल्या विद्यार्थ्यांचा शालांत परीक्षेचा निकाल हा १००% लागतो. मात्र असे असताना एमपीएससी आणि यूपीएसस, बँकिंग व तत्सम सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता समाधानकारक का दिसत नाही?, हा चिंताजनक विषय आहे. विद्यार्थ्यांनी बालवयातच स्पर्धा परीक्षांची कास धरावी, त्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची मानसिकता तयार व्हावी, या प्रांजळ उद्देशाने संदीप गावडे फाऊंडेशन या वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा’ परीक्षा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते संदीप गावडे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
युवा नेते संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीसाठी ‘यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा’ आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीसाठी ही स्पर्धा परीक्षा प्रथमतः सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांसाठी मर्यादित स्वरूपात घेण्यात येणार आहे. या तीनही तालुक्यातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे, असेही संदीप गावडे यांनी सांगितले.
पुढील टप्प्यात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी ते इयत्ता बारावीपर्यंत ही स्पर्धा घेण्याचा मानस असून आगामी काळात संपूर्ण जिल्हाभर याची व्याप्ती वाढणार असल्याचेही श्री. गावडे यांनी नमूद केले.
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या फाऊंडेशनमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. या परीक्षेचा उद्देश फक्त एका वर्षासाठी मर्यादित नसून गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी प्रोत्साहित केले जाणार आहे. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे हा या परीक्षेचा प्रमुख उद्देश आहे, असे फाऊंडेशनचे सचिव व प्राथमिक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी सांगितले.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप गावडे, विद्यमान अध्यक्ष सुधीर गावडे, उपाध्यक्ष रोशन राऊत, सचिव दत्ताराम सावंत, कार्यकारिणी सदस्य सतीश राऊळ, प्रवीण शेर्लेकर, महेश सावंत, समीर जाधव, भास्कर गावडे, तेजस्विता वेंगुर्लेकर, राधिका परब, स्वाती पाटील, रुपेश परब, जे. डी. पाटील, सुरेंद्र विर्नोडकर, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.