सावंतवाडीत स्वातंत्र्यदिनी कॅण्डल मार्च काढत केला निषेध व्यक्त
सावंतवाडी,दि.१६ : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील एका ३१ वर्षीय ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी संप पुकारत याचा निषेध केला. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या वतीने या घटनेचा स्वातंत्र्यदिनी निषेध व्यक्त करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आयुर्वेद महाविद्यालयापासून ते जगन्नाथराव भोसले शिव उद्यानापर्यंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शांततेने ‘कॅन्डल मार्च’ करत या घटनेचा निषेध व्यक्त केला.
शिव उद्यान येथे विद्यार्थ्यांनी या दुर्दैवी पीडित डॉक्टर महिलेला श्रद्धांजली अर्पण केली. महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा धोटे हिने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज ७८ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत तरी देखील आपण खरोखर स्वतंत्र आहोत का?, कारण मोठमोठ्या महानगरांमध्ये महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोलकात्यातील ही घटना म्हणजे अमानवीय घटना असून सर्व स्तरावरून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. सदर पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी जन आंदोलन उभारले पाहिजे. आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी यासाठी कठोर पावले उचलावीत. समाजातील अशा दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असेही आवाहन स्नेहाने केले.