Site icon Kokandarshan

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरशिंगे ग्रामपंचायत च्या वतीने महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण…

सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील शिरशिंगे येथे आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरशिंगे यांच्या वतीने कार्यक्षेत्रातील महिलांसाठी कापडी पिशव्या बनवणे या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरशिंगे ग्रामपंचायत सरपंच दीपक राऊळ व पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सचिन धोंड, पोलीस पाटील गणू राऊळ,ग्रामसेवक स्वप्नील तारी,ग्रामसंघ अध्यक्ष सौ. सेजल लाड, ग्रामसंघ सचिव सौ.दिपाली दळवी प्रशिक्षक अर्चना वाडकर, सीआरपी (CRP) मयुरी राणे, प्रियांका जाधव, रविना राऊळ तसेच सामाजिक कार्यकर्ते,गावातील माजी सैनिक तसेच कोकण कला शिक्षण विकास संस्थेचे कार्यक्रम समन्वयक भगवान चव्हाण उपस्थित होते.

दरम्यान सर्व मान्यवरांचे कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या वतीने भगवान चव्हाण यांनी स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना सरपंच श्री.राऊळ, विस्तार अधिकारी श्री. सावंत व प्रशिक्षिका यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अर्चना वाडकर यांनी कापडी पिशव्यांचे विविध प्रकार दाखविले, त्यामध्ये हॅन्ड बॅग,समोसा बॅग, पाऊच, मोबाईल पर्स, पोटली बॅग, सिंगल बॅग, डबल चेन बॅग, बटवा,साधी पिशवी,फॅन्सी बॅग इत्यादींचा समावेश आहे.
या प्रशिक्षणा साठी एकूण ४० महिला सहभागी झाल्या असून हे प्रशिक्षण दोन दिवस चालणार आहे.
कापडी पिशव्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीने ग्रामपंचायत शिरशिंगे यांनी उचललेले पाऊल हे माझी वसुंधरा अभियानाला पूरक असे आहे. तसेच बचत गटातील महिलांसाठी या प्रशिक्षणामुळे आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी उपयोग होईल तसेच तसेच घरच्या घरी टाकाऊ कापडापासून विविध प्रकारच्या टिकाऊ पिशव्या बनवून आणि त्याची विक्री करून थोडीफार बचतही करता येईल. अनेक वर्षे चांगल्या प्रकारे आर्थिक गणिते सांभाळताना महिला गटांनी गावाच्या अभियानात भाग घेत घरोघरी बायोगॅस, गांडूळ खत युनिट व शोषखड्डा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. असे आवाहन कृषी विस्तार अधिकारी श्री.सावंत यांनी केले.

हाती बनवलेल्या अशा वस्तू सण समारंभाला वाटता येऊ शकतात. व प्लास्टिक वापरू नको असे सांगताना काय वापरावे यासाठी गावातल्या लोकांनी शाश्वत पर्याय म्हणून कापडी पिशव्याचा वापर वाढवला पाहिजे व माझी वसुंधरा अभियानाला आवश्यक कापडी पिशव्या वाटप करण्यासाठी गावातीलच महिलांना १००० पिशव्या शिवण्याचे काम देत असल्याचे सरपंचानीं जाहीर केले.

तसेच आपल्या कुटुंब स्तरावर बायोगॅस, गांडूळखत युनिट व शोष खड्डा करेल अशा महिलेला येणाऱ्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करण्याचा मान दिला जाईल असे यावेळी सरपंच श्री राऊळ यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी दिलेला या निर्णयाचा उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले.

Exit mobile version