सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव
सावंतवाडी,दि.३१: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. विराज नंदकिशोर राऊळ याचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कु. विराज राऊळ, ओटवणे हायस्कूलचे गणित तसेच विज्ञान विषय शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा सुपुत्र, लहानपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत आला आहे. विशेष म्हणजे, यंदा ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विराजच्या या कलेचे आणि शैक्षणिक यशाचे कौतुक करीत सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाने त्याचा विशेष गौरव करून त्याच्या कलेला आणि यशाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्यें, सचिव राहुल समुद्रे, खजिनदार संजय शेवाळे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे सहसचिव तथा माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, आणि माजगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक रोहिदास केंगले उपस्थित होते.