Site icon Kokandarshan

सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सवाचे आयोजन..

सावंतवाडी,दि.२६ : सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत ‘मान्सून महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवात विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, सल्लागार संजू परब तसेच विद्यमान अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केले आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे सचिव प्रताप परब, सदस्य शशिकांत मोरजकर व सदस्य सुहास सावंत आदी उपस्थित होते. या मान्सून महोत्सवाचा शुभारंभ २७ जुलै रोजी कलंबिस्त हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. यानिमित्त कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त मुलांचा गुणगौरव व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.
तर ४ ऑगस्ट रोजी सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात बेबीज वर्ल्ड व स्पोर्ट्स पुरस्कृत सुदृढ बालक स्पर्धा होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉल येथे रानभाजी स्पर्धा होणार आहे. १८ ऑगस्ट रोजी सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे जिल्हास्तरीय भक्तीगीत व अभंग गायन स्पर्धा होणार आहे. तर या मान्सून महोत्सवाचा समारोप १९ ऑगस्ट रोजी होणार असून या निमित्त सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ “पै” सभागृहात अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी ‘ हा गाजलेला दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

या महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या नोंदणीसाठी मिलाग्रिस हायस्कूल लगत निर्माण भवन येथे असलेल्या बेबीज वर्ल्ड येथे संपर्क साधावा तसेच सुनिल राऊळ 9422055010, रवींद्र मडगावकर -9421272177, प्रल्हाद तावडे 9422584430, संतोष सावंत 9423851530, सुहास सावंत 9405228374, प्रताप परब 9404740952 व विभावरी सुकी 8275775972 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version