Site icon Kokandarshan

गुरुंनी दिलेली शिकवण जीवनात यशस्वीतेचा मार्ग दाखवते…अर्चना घारे

विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरूपौणिमा उत्सव साजरा…

सावंतवाडी,दि.२४: गुरूचे योग्य ते मार्गदर्शन असल्यास आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होवू शकतो. त्याच बरोबर कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची हिम्मत होवू शकते. त्यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण कायम ध्यानात ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी येथे केले. दरम्यान विश्व डान्स अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून सावंतवाडीतील मुलांना देण्यात येत असलेले भरतनाट्यम सारख्या धड्यामुळे निश्चित येथील विद्यार्थी वेगळे काही तरी शिक्षण घेतील, असे त्यांनी सांगितले.
येथील विश्व अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून गुरू पौणिमा साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सावंतवाडी पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण, सिंधुदुर्ग डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पुजा दळवी, सायली दुभाषी, युवा पत्रकार भुवन नाईक, डान्स अ‍ॅकेडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर, सौ. शितल आर्लेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सौ.घारे म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक कलेला अन्यन्य साधारण महत्व देण्यात आले आहे. ही परंपरा जोपासून नवोदित विद्यार्थ्यांना घडविण्याचे सुरू असलेले हे काम कौतुकास्पद आहे.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, गुरूंनी दिलेल्या शिकवणीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी होतो. नव्या पिढीने ही गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात केले पाहिजे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेवून आपले नाव क्षेत्रात उंचावण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी.
यावेळी श्री. टेंंबकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी हेमंत राऊळ, अजित मसुरकर, सतिश पावसकर, प्रतिक मसुरकर, राहुल सुर्यवंशी, शेखर चव्हाण, अमित राऊळ आदी उपस्थित होते.

Exit mobile version