सतत पाठपुरावा करूनही कार्यारंभ आदेश होत नसल्याने उपोषणाचा निर्णय – गुरु कल्याणकर
सावंतवाडी,दि.१६: येथील बांदा शहरातील मंजूर विकास कामांचा दोन वर्षे उलटूनही अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांना १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसण्याची पूर्वसूचना दिली. यावेळी बोलताना कल्याणकर यांनी सांगितले की, आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर करून आणतो. परंतु सदर कामांचे अंदाजपत्रक,टेंडर प्रक्रिया तसेच कार्यारंभ आदेश वेळेत न झाल्याने सदर कामे गेली दोन वर्षे प्रलंबित आहेत. याकरिता संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करूनही अंदाजपत्रक न होणे, ईतर तांत्रिक बाबी अशा सबबी सांगून केवळ आश्वासने देण्यात येत होती. आम्ही प्रयत्न करून विकासकामे मंजूर करून आणतो व तो विकासनिधी वापर न होता परत गेल्याने आमच्या शहराला त्याचे नुकसान सोसावे लागते. सदर विकासकामे वेळेत न झाल्याने या पावसात शहरातील दोन ठिकाणी पाणी साठुन स्थानिक नागरिक व व्यापारी यांचे नुकसान झाले. त्यामुळे सर्व सोपस्कार तातडीने पूर्ण करून या विकास कामांना कार्यारंभ आदेश मिळावा, याकरिता १५ ऑगस्ट रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालयाखाली उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने पुन्हा आचारसंहिता लागू झाल्यास सदर १ कोटी ८० लाखांची विकासकामे ही पुन्हा प्रलंबित राहतील. तसे होऊ नये व विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे श्री कल्याणकर म्हणाले.
यावेळी गुरु कल्याणकर यांच्यासोबत हेमंत दाभोलकर उपस्थित होते.