Site icon Kokandarshan

सध्याच्या डिजिटल युगात मुलामुलींच्या संस्काराकडे जास्त लक्ष देण्याची गरज..स्त्री रोग तज्ञा डॉ सौ गौरी गणपत्ये

लाखे वस्तीतील युवतीसह महिलांसाठी सिंधुमित्र प्रतिष्ठाना मार्फत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन..

सावंतवाडी,दि.०४: भारतीय संस्कार हे स्त्री सुरक्षा व आरोग्य या दोन्हीचे रक्षण करणारे असुन सध्याच्या डिजिटल युगात मुलामुलींच्या संस्काराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच गैरसमजुतीतून आरोग्यास नुकसानकारक अशा घातक प्रथापरंपरा परंपरांचा त्याग करून आरोग्यपूर्ण सवयी अंगिकारण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन माणगाव येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञा डॉ सौ गौरी गणपत्ये यांनी केले.
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिमखाना लाखेवस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या “स्त्री तारुण्याच्या वळणवाटा” या कार्यक्रमात डॉ सौ गौरी गणपत्ये बोलत होत्या.
यावेळी डॉ सौ गौरी गणपत्ये उपस्थित युवतीसह महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, एक स्त्रीच्या आयुष्यात जन्मापासून अनेक बदल होत असतात. ते शारीरिक, मानसिक, सामाजिक व वैयक्तिक भावभावनांचे सुद्धा असतात. प्रत्येक बदल हा तिला सहजपणे स्वीकार्य असला पाहिजे. या करीता कुटुंबाची साथ तसेच योग्य प्रशिक्षणाची गरज असते. मासिक पाळीची सुरवात होत असतांना तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी हे बदल प्रकर्षाने जाणवतात यावेळी मानसिक तसेच शारीरिक स्तरावर योग्य काळजी घेणे विशेषत्वाने गरजेचे असते.
यावेळी डॉ सौ गौरी गणपत्ये यांनी पॉवर पॉईंट स्लाइड्स व चलचित्रांच्या माध्यमातून स्त्री शरीर रचना, त्यात वयानुसार होणारे बदल ई विषयी सविस्तर माहिती त्यांनी सहभागी उपस्थित युवतीसह त्यांच्या मातांना दिली. यावेळी डॉ सौ मुग्धा ठाकरे म्हणाल्या, त्वमेव माता च पिता त्वमेव” या मंत्रात सर्वप्रथम मातृशक्तीची वंदना केली आहे. दुर्गा, भवानी, सरस्वती, महालक्ष्मी, रासाई अशा अनेक रुपात आपण स्त्रीत्वाचा सन्मानच नाही तर पूजन देखील करतो. त्यामुळे या स्त्रीची काळजी जन्मापासूनच घ्यायला पाहिजे.
यावेळी दुर्लक्षित लाखे वस्तीतील युवतीसह महिलांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या डॉ सौ मुग्धा ठाकरे यांनी स्वागत सौ सुमन पाटील यांनी तर आभार सौ अनघा शिरोडकर यांनी मानले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version