प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन जाणून घेतल्या समस्या
सावंतवाडी,दि.३० : तालुक्यातील मळेवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या निर्माण झाल्या असून तेथील कर्मचाऱ्यांचे वेतनही प्रलंबित आहे. त्यामुळे आगामी काळात येथील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले.
बुधवारी त्यांनी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य आणि आपल्या वेतनासंदर्भात विविध समस्या अर्चना घारे यांच्याजवळ कथन केल्या.
दरम्यान आपण या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू असा विश्वास यावेळी सौ. घारे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत मळेवाड ग्रा. पं. सदस्य सानिका शेवडे, नारायण घोगळे, बाबा कोकरे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा नीतिशा नाईक, दीपक करमळकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.