सावंतवाडी,दि.१२ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा सौ सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या.
यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची निवडणूक हि लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशात गलिच्छ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हितासाठी लढणाऱ्यावर सुड बुध्दीने कारवाई, धाडी, अटकसत्र करण्याचा नवा गलिच्छ पायंडा केंद्रातील आणि राज्यातील सरकारने पाडला आहे. दहा वर्षांपूर्वी पासून पोकळ आश्वासने देत, मोठमोठ्या वल्गना करत अच्छे दिन येणार, भ्रष्टाचार संपविणार असे खोटे स्वप्न या केंद्र सरकारने दाखविले. प्रचंड महागाई, युवांमधील बेरोजगारी, इलेक्टोरेल बाँड मधील भ्रष्टाचार, संविधानिक मार्गाने सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी केलेला बळाचा वापर, ईशान्येकडील राज्यांतील जनतेचा रोष, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचेल अशी बेजबाबदार वर्तन, वक्तव्ये करणारे नेते ही केंद्र सरकारची प्रतिमा आहे. त्यामुळे या देशाला वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे असे लोकांची भावना तयार झालेली आहे. खासदार सुप्रिया सुळे अत्यंत अभ्यासू , हुशार आणि कर्तबगार आहेत त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. नागरिकांशी प्रचारात संवाद साधताना नागरिकांचा जोश उत्साह पाहता बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे या अधिक मताधिक्याने निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी सुप्रियाताई सुळे या पुन्हा एकदा दिल्लीत आवाज उठवतील आणि नागरिकांना न्याय देतील. अश्या प्रकाराच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
पुण्यातील प्रचारात आमदार संग्राम थोपटे, स्वाती ढमाले महिला शिवसेना ( उभाठा ) संपर्क प्रमुख पुणे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी होते.