Site icon Kokandarshan

यशस्वी होण्यासाठी अंत:प्रेरणेची नितांत गरज.! – प्रा. रूपेश पाटील

कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव विद्यापीठात व्याख्यान संपन्न.

सावंतवाडी,दि.१९ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला स्वतःची अंत:प्रेरणा जागृत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीत आंतरिक प्रेरणा असते, ज्यामुळे व्यक्ती कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि त्याच्यामुळेच तो आपल्या जीवनात यशस्वीही होतो. विद्यार्थीदशेत अशा आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळेतून युवा वर्गाला दिशा मिळते आणि त्यांना जीवन जगण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास मिळतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळा व विद्यार्थी विकास विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळा’ या विद्यापीठस्तरीय तीन दिवसीय कार्यशाळेत प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संचालक डॉ. मनिषा इंदाणी उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर शिक्षणशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. रणजीत पारधे, डॉ. स्वाती तायडे आदी उपस्थित होते.

या तीन दिवशीय कार्यशाळेत सावंतवाडी येथील प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया स्वतःला.!’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रा. पाटील पुढे म्हणाले की, आपले आयुष्य हे दहा गिअर्सच्या सायकल सारखं असतं. मात्र बहुतेक जण हे दहा गिअर्स असूनही ते कधीच वापरत नाहीत. म्हणूनच ते अपयशी होतात. यासाठी आपण स्वतः अंत:प्रेरणा घेऊन जगले पाहिजे.:विद्यार्थ्यांनी स्वतःकडे असलेली धडाडी, ऊर्मी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. प्रेरणेचे दोन प्रकार असून एक अंत:प्रेरणा व दुसरी बाह्य प्रेरणा असते. बाह्य प्रेरणा ही बाहेरून मिळते. जसे की, आपले आई-बाबा व गुरुजन आपल्याला आपण चुकलो की आपणास शाब्दिक अथवा शारीरिक मार देतात. जेणेकरून आपण आपले चांगले जीवन जगावे, अशी यामागील त्यांची प्रेरणा असते. मात्र त्याचा आपण नकारात्मक भावनेने विचार केला तर भरकटण्याची सुद्धा शक्यता असते, असे सांगत प्रा. पाटील यांनी युवा वर्गाने नेमके काय करावे?, बाह्य आकर्षण व लालसा यांपासून स्वतःला कसे दूर ठेवावे?, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी विविध मनोरंजनात्मक व ज्ञानप्रबोधनात्मक खेळ शिबिरार्थी विद्यार्थी – विद्यार्थिनींना शिकवून कार्यशाळेत रंगत आणली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेच्या संचालिका डॉ. मनीषा इंदाणी म्हणाल्या, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा जागृत व्हावी, यासाठी विद्यापीठस्तरावरून सदर कार्यशाळेचे आयोजन केले असून धुळे, नंदुरबार व जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा मिळेल, असे सांगत त्यांनी कार्यशाळेमागील हेतू स्पष्ट केला.

कार्यशाळेचे प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्य्क प्रा. डॉ. रणजीत पारधे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्रा. डॉ स्वाती तायडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान यावेळी प्राध्यापक रुपेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे प्रश्नोत्तर पद्धतीने निरसनही केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version