सावंतवाडी,दि.१३: दाणोली- आंबोली या मार्गावरील देवसु वनपरीमंडळ नजीकच्या धोकादायक वळणावर अनेक वेळा अपघात घडले. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बहिर्वक्र आरसे बसविण्याबाबत बांधकाम खात्यासह संबंधित खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर या ठिकाणी लोकसहभागातून बहिर्वक्र आरसा बसविण्यात आला. त्यामुळे वाहन चालकांसह शेतकरी व पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सावंतवाडी – बेळगाव या राज्यमार्गा दरम्यान धोकादायक वळणा पलीकडच्या देवसू वन परिमंडळ कार्यालयाकडे शेतकरी तसेच लाकूड व्यावसायिक ये जा करत असतात. परंतु या ठिकाणच्या धोकादायक वळणामुळे दोन्ही बाजूकडची वाहने दृष्टीक्षेपात येत नसल्याने या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे या धोकादायक वळणाच्या रुंदीकरणासह या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसवण्याची वाहन चालकांसह पादचाऱ्यांची मागणी होती. त्या दृष्टीने देवसु दाणोली तंटामुक्त समिती अध्यक्ष समीर शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित खात्याकडे पाठपुरावा केला परंतु याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्यामुळे लोकसहभागातून या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसवण्यासाठी समीर शिंदे यांनी पुढाकार घेतला.
या बहिर्वक्र आरशातून या धोकादायक वळणाकडून सावंतवाडीसह आंबोलीकडे जाणारी वाहने दृष्टिक्षेपात येतात. या धोकादायक वळणाच्या ठिकाणी बहिर्वक्र आरसा बसविण्यात आल्यामुळे लाकुड व्यापारी, शेतकरीवर्गामधे समाधान व्यक्त होत आहे. यासाठी अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे परब, समीर शिंदे, देवसू वन परिमंडळाचे वनपाल, वनरक्षक, ग्रामपंचायत सदस्य पंकज परब, लाकुड व्यापारी अजय निंबाळकर, विज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, गोविंद सावंत, प्रकाश सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.