सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम.!
सावंतवाडी,दि.०८: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकार भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल कामत, दिव्या वायंगणकर, मंगल नाईक – जोशी, जुईली पांगम, अनुजा कुडतरकर या पत्रकार रणरागिणी यांचा मान्यवर व्यक्तींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनया बाड होत्या. यावेळी व्यासपीठावर अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, जिल्हा खजिनदार संतोष सावंत आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अर्चना घारे परब यांनी सांगितले की, आजच्या घडीला आपली महिला कोणत्याही क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे. वर्षाचे ३६५ दिवस जरी महिला दिन साजरा केला तरीदेखील तो कमीच आहे. भारतीय महिलांनी आज जागतिक स्तरावर आपले नाव कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. असा आणि वारसा निरंतर चालू ठेवावा, अशी अपेक्षा सौ. घारे यांनी व्यक्त केली.
पत्रकार गजानन नाईक यांनी देखील भारतीय महिला या अनादी काळापासून आपल्या कार्याने अजरामर ठरले आहेत यात संत मुक्ताई, संत मीराबाई, थोर लढाऊ बाणा असलेल्या झांसीची राणी लक्ष्मीबाई तसेच यशस्वी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करावा लागेल. आपण आपल्या जीवनात त्यांचा आदर्श ठेवून वाटचाल करावी, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. विनया बाड म्हणाल्या की, आजच्या काळात स्त्री – पुरुष समानता आली आहे, हे निश्चितच सुखकारक व आशावादी चित्र आहे. मात्र तरी देखील पाश्चात्य देशांच्या तुलनेने आपल्याकडे अजूनही लैंगिक समानता येणे आवश्यक आहे. असे झाल्यास निश्चितच महिलांना योग्य न्याय मिळेल आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतील. आज भारतीय स्त्री ही जगात सर्वात सौजन्यशील आणि चारित्र्यवाण स्त्री म्हणून ओळखली जाते. याचे श्रेय आपल्या परंपरावादी महान संस्कृतीला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सत्कारमूर्ती महिला पत्रकार मंगल कामत, मंगल नाईक – जोशी, दिव्या वायंगणकर, जुईली पांगम व अनुजा कुडतरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन राजेश मोंडकर यांनी केले.
यावेळी माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, नरेंद्र देशपांडे, काका भिसे, नीतेश देसाई आदी सामाजिक कार्यकर्त्या पूजा दळवी, ॲड. सायली दुभाषी या देखील उपस्थित होत्या.