चिपळूण, दि .०४(ओंकार रेळेकर): कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा गुहागर, आणि सह्याद्री समाचार आयोजित शाहीर शाहिद आदम खेरटकर (चिपळूण) शब्दाली प्रकाशन, पुणे प्रकाशित व लिखित “ललकारी”काव्यसंग्रहाचा प्रकाशन, समारंभ नुकताच बाळशास्त्री जांभेकर सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय,चिपळूण येथे ३ मार्च रविवार २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न झाला.मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून “विवेकाचे आणि विचारांचे झाड वाढत राहो” या संकल्पनेतून त्याच बरोबर”पर्यावरणाचा संदेश देत या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.शाहीर शाहीद आदम खेरटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात आजच्या दिवसाचे औचित्य सांगून आपल्या वडीलांच्या स्मृती जागवल्या. ललकारी आकारास येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार मानले. प्रसिद्ध लेखक. श्री. अभिराम भडकमकर,मुंबई( प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक,चित्रपट ,पटकथा) यांच्या शुभहस्ते ललकारी प्रकाशन समारंभ संप्पन्न झाला.त्यांनी या प्रसंगी ललकारी या कविता संग्रहाचे आणि शाहीर शाहिद खेरटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले. “ललकारी” या काव्यसंग्रहातील कविता जरी एका शाहीराने लिहीली असली तरी ती प्रचारकी नाही ती सहज मनात आलेल्या आपल्या भावना उत्स्फुर्तपणे मांडणारी कविता आहे,तिच्यामध्ये जे आत्मचिंतन आहे ते सर्वांना विचार करायला लावणारे आहे ,समाजाच्या चिकित्सेबरोबर ही कविता आत्मचिकित्सा करते परखडता हा तिचा गुण आहे नव्या नव्या मूल्यांना ही कविता मांडत जाते, तिचा भाव हा मानवतावादाचा आहे.ती सहज सोपी कविता “काळजपासून निघून काळजापर्यंत”जाणारी कविता आहे.प्रमुख भाष्य प्रसिद्घ साहित्यिक डॉ. संजय बोरूडे यांचे होते;त्यात त्यांनी मराठी शाहीरी परंपरेला समृद्ध करणारी कवणे ललकारी मध्ये आहेत त्याशिवाय अभंग छंदातील कविता प्रभावी आहे.सुंदर प्रतिमा प्रतिक रूपक अनुप्रासाचा उपयोग त्यांनी आपल्या कव्यामध्ये केला आहे त्यामुळे वाड्मयीन गुणांनी संप्पन्न अशी ही कविता आहे असे उदगार काढले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक कवी,गीतकार,गझलकार,कादंबरीकार समीक्षक,संपादक संशोधक साहित्यिक प्रा. डॉ.बाळासाहेब लबडे प्रसिद्ध साहित्यिक,शृंगारतळी हे होते.त्यांनी अध्यक्षिय मनोगतात
,”लोकशाहीर शाहिद खेरटकर यांचा “ललकारी” हा पहिला काव्यसंग्रह ललित पब्लिकेशन, मुंबई, यांच्यामार्फत प्रकाशित होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.त्यांचा पहिला कविता संग्रह वाचकांना उपलब्ध होण्यासाठी दीर्घ कालावधी गेलेला आहे. महाराष्ट्रभरातील श्रोत्यांनी कलगी तुरा या लोककलेच्या कार्यक्रमातून त्यांना ऐकले आहे.त्याची शाहीरी बहारदार,खटकेदार, संवादात्मक,आवेशात्मक आणि जोषपूर्ण वातावरणात अंगात वीज सळसळल्या प्रमाणे आहे.त्यांच्या वाणीला धार आहे.शब्दांच्या तलवारी चालू लागतात,शब्द हे शस्त्र आहे,त्यातून जशी अध्यात्मातील भक्ती व्यक्त होते तसाच वीर आणि शृंगार रसाचा आविष्कार देखील त्यांच्या वाणीतून प्रसवू लागतो.ही कविता केवळ पुस्तकी नाही तर ती जगण्याच्या अनुभवातून आलेली ललकारी आहे.”
असे उदगार काढले.विशेष अतिथी प्रमुख उपस्थितीत आ. शेखर निकम आमदार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या खेरटकर यांचे कौतुक केले,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी कवितासंग्रह महत्वपुर्ण असल्याचे सांगून आपल्याला एक वैचारिक वारसा पुढे नेणारा मित्र लाभला याचे समाधान व्यक्त केले.त्या बरोबरच चिपळूणचे उद्योजक प्रशांत यादव यांनी देखील मनसोक्त अभिनंदन केले.ज्या शिक्षण संस्थेत शाहीर शाहिद यांचे माध्यमिक शिक्षण झाले त्या संस्थेचे पंधरागाव सार्वजनिक माध्यमिक शैक्षणिक संस्था श्री.अनंतराव पालांडे यांनी भावनेने ओतप्रोत अशा शुभेच्छा दिल्या आणि आपल्या संस्थेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला. विद्याधर भुस्कूटे ,(दिगंत डोंबिवली भूषण )मा. शाहीर दत्ताराम आयरे ,कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य केंद्रीय कार्यकारिणी आबा पाटील, माधव अंकलगे,दळवी हे पदाधिकारी ,पत्रकार सतीश कदम ,उपस्थित होतो.सर्व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, गुहागर जि. रत्नागिरी,सह्याद्रि समाचार न्यूज चॅनल चिपळूण यांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या सोहळ्याचे सूत्रसंचालन अमित आदवडे यांनी केले तर आभार अशोक भुस्कुटे यांनी मानले.कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला.