चिपळूण,दि.२९ : चिपळूण तालुका विज्ञान मंडळातर्फे दरवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेली “आदर्श विज्ञान छंद मंडळ” स्पर्धा ही त्यापैकी एक. या स्पर्धेसाठी प्रशालेमध्ये वर्षभरात घेण्यात आलेल्या विज्ञान विषयक उपक्रम एकत्रित करून त्याची फाईल मंडळाकडे जमा केली जाते. दलवाई हायस्कूल मिरजोळी या प्रशालेने ही उपक्रमांची फाईल तालुका विज्ञान मंडळाकडे जमा केली व या स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. त्यातून तालुकास्तरावर प्रशालेचा प्रथम क्रमांक आला व पुढे जिल्ह्याला प्रथम क्रमांकाची फाईल सादर केल्यावर तिथेही प्रशालाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांनी काम पाहिले आणि जिंदाल फाउंडेशन, रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या बक्षीस वितरणामध्ये डाएटचे प्राचार्य श्री. शिवलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री. आघाव आणि सौ.मृणाली जाधव यांनी त्यांना सहकार्य केले.प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जाधव आणि सर्व संस्था चालकांनी विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.