शाळेच्या यशामागे शाळा समिती सह मुख्याध्यापक व पालकांचे योगदान महत्त्वाचे ..
सावंतवाडी ता. २५:जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत असताना सावंतवाडीतील सुधाताई वामनराव कामत या शाळेने राबविले उपक्रम आणि मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. म्हणूनच त्यांना पाचवीचा वर्ग मंजूर झाला. आता पुढचे चॅलेंज त्यांनी नक्कीच स्विकारावेत, असे आवाहन सिंधुदुर्गाचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी केले. या यशामागे शाळा समितीसह मुख्याध्यापक आणि पालकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच या शाळेचा दर्जा सुधारण्यास मदत झाली. हा दर्जा कायम रहावा, येथिल विद्यार्थी कायम स्पर्धेत पुढे रहावेत, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असेही ते यावेळी म्हणाले. सावंतवाडी येथिल शाळा नं.२ चा वार्षिक स्नेहसंमेलानाचा कार्यक्रम काल सायंकाळी उशिरा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थ्यानी विविध कलाविष्कार सादर केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ कार्याध्यक्ष भरत गावडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व योगा शिक्षक विकास गोवेकर, माजी नगराध्यक्ष राजन पोकळे, पत्रकार तथा ओंकार कला मंचचे संस्थापक अमोल टेंबकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू गावडे, डॉ. लेले, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सावंतवाडी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, अजित सावंत, रजत जाधव आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. तर याप्रसंगी संभाजी राजांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे व्याख्यान सादर करून चिन्मय कोटणीस या चिमुकल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री. पोकळे म्हणाले, प्रशालेची वाटचाल यशाकडे होताना दिसत आहे. त्याचेच उदाहरण म्हणजे या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू होणे हे आहे. भविष्यात प्रशालेला कोणती मदत लागल्यास मला हक्काने हाक द्या. या प्रशालेचा माजी विद्यार्थी म्हणूनच त्या हाकेला मी धावून येईन. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रशालेला जास्तीत जास्त मदत करण्यासाठी माझे प्रयत्न असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना श्री. टेंबकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्यातील कला गुण सुद्धा जोपासले पाहिजे. कलागुणांमधून नेहमीच आपली एक वेगळी ओळख निर्माण होत असते. शिक्षणा एवढीच आपल्यातील सुप्त गुणांना किंमत आहे. भविष्यात आपल्याला मोठं करण्यासाठी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असलेले सुप्त कला गुण सुद्धा तेवढेच उपयोगी येतात, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षणाबरोबरच आपले कला गुण सादर करण्याची मिळालेली संधी कधीही सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.