सावंतवाडी,दि.२९: आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, सृजनशीलता जपणाऱ्या, तसेच परिवर्तनवादी स्त्री भूमिकेची कवितेतून प्रगल्भ मांडणी करत व्यवस्थेला खडे सवाल करणाऱ्या सावंतवाडी येथील युवा कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांना त्यांच्या ‘शिल्लक भीतीच्या गर्भकोशातून’ या संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा राजगुरूनगर पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार सन २०२३-२४ नुकताच जाहीर झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यापूर्वी कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांना मानाचा समजला जाणारा नाशिक येथील कवी नारायण सुर्वे वाचनालयाचा कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार मराठी साहित्यातील थोर विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार उत्तम कांबळे, आजचे आघाडीचे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
कवयित्री स्नेहा कदम यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला कवी भीमराव कोते याजबरोबर पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार सन २०२३-२४ हा राज्यातील आणखी एक प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सम्यक साहित्य संसद,अपरांत साहित्य कलाप्रबोधिनी, साहित्य संघ, सावंतवाडी या साहित्यिक संस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.
कवयित्री स्नेहा कदम यांच्या काव्यसंग्रहाला नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार जाहीर

