गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते सन्मानित
कणकवली,दि.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री प्रियदर्शनी पारकर – म्हाडगुत ( फोंडाघाट) आणि कवयित्री योगिता शेटकर यांनी मुंबई एकता कल्चर अकादमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा एकता कल्चर महोत्सवात पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई गिरगाव साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई एकता कल्चर महोत्सवात विख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते सदर पारितोषिकाने कवयित्री पारकर आणि कवयित्री शेटकर यांना सन्मानित करण्यात आले.
मुंबई एकता कल्चर अकादमीतर्फे दरवर्षी चित्रपट नाटक संगीत सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षीच्या २०२३ च्या जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना गौरविण्यात आले. यावेळी एकदा कल्चर महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे पारितोषिकही वितरण करण्यात आले.यात कवयित्री पारकर आणि कवयित्री शेटकर यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी एकता अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, डॉल्बी गीत फेम गायक नागेश मोरवेकर, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, चित्रकार गायक भगवान दास, हिंदी अनुवादक रमेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.