सावंतवाडी,दि.१४: तालुक्यातील आंबोली पट्यातील गेळे हे गाव मागील ४८ तासापासून पूर्ण अंधारात आहे.
गेळे डुरेवाडी येथील सतत चर्चेत असणारा ट्रान्सफॉर्मरवर रात्रीच्या सुमारास ८४० वोल्ट विद्युत दाब आल्यामुळे मोठा स्फोट होवून ट्रान्सफॉर्मर जळाला आहे व डूरेवाडी, आंबोली गावठाणवाडी तसेच आंबोली फणसवाडी येथील सर्व घरांचा विद्युतपुरवठा सलग ४८ तासापासून खंडित झाला आहे अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
विजेच्या अतिउच्च दाबामुळे ५०ते ६० घरांमधील विद्युत उपकरणे देखील जळाली आहेत त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच असेही सांगण्यात येते की मागील एक वर्षांपूर्वी आंबोली तलाठी श्री घाडीगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे व तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या आदेशाने सदर ट्रान्सफॉर्मर लगत असलेले अतिक्रमण हटवल्यामुळे आज मोठी जीवित हानी टळली गेली. परंतु कनिष्ठ अभियंता श्री चव्हाण यांनी महावितरणला वारंवार सुचित करूनही महावितरणने आजतागायत ट्रान्सफॉर्मरभोवती संरक्षण कुंपण उभारले नाही. महावितरण या निष्काळजीपणामुळे आमचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे. सदर ट्रान्सफॉर्मर लगत संरक्षण कुंपण उभारून आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी महावितरण कार्यालयसमोर उपोषणाला सर्व ग्रामस्थ बसणार आहेत असे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.