Site icon Kokandarshan

कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

सावंतवाडी,दि.२६: आपल्या शालेय जीवनातील रम्य व सुखद स्मृतींना उजाळा देत,शाळा व गुरुजनांप्रती आदर व आस्था व्यक्त करीत तब्बल २५ वर्षांनी एकत्र आलेल्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कलंबिस्त हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सिताराम सुर्वे,विजयकुमार पाटील, माजी शिक्षक व संस्थेचे विद्यमान संचालक शिशकांत धोंड, माजी शिक्षकेतर कर्मचारी रामचंद्र सावंत,मधुकर नाईक, मधुकर कदम प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, प्रशालेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या उपस्थित मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दिवंगत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आठवण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व उपस्थित आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते कृतज्ञतेचे व स्नेहाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सिताराम सुर्वे व विजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून या विद्यार्थ्यांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण भागातील या शाळेत तत्कालीन परिस्थितीत शिक्षण घेत या विद्यार्थ्यांनी आज अनेक क्षेत्रांत आपली यशस्वी कारकीर्द घडवली आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलचे आपले ऋणानुबंध जपत आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले याबद्दल आभार मानले.
प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सातत्याने आपल्याशी संपर्कात राहून प्रयत्न केले.अशा प्रकारचा आजवरचा हा पाचवा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा असून अशाप्रकारचे स्नेहमेळावे म्हणजे शाळा व गुरुजनांविषयी आस्था व प्रेम यांचेच प्रतिक आहे. शाळेच्या विकासात्मक वाटचालीसाठी व विद्यार्थ्यांसाठी असे स्नेहमेळावे प्रेरणादायी असल्याचे मत मांडले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या स्नेह मेळाव्यासाठी या बॅचमधील उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी कल्पना मेस्त्री,पल्लवी पास्ते,शिल्पा पावसकर, चंद्रकला राऊळ ,लता पास्ते,नरेंद्र गावडे,प्रमोद पुजारी, रूपा राऊळ,वामन राऊळ, महेश राऊळ, रघुनाथ सावंत, भिवा कुडतरकर, प्रमोद लिंगवत, चंद्रशेखर पारधी, प्रशांत राऊळ यांनी आपली ओळख करून देत शाळा व शिक्षकांविषयीच्या रंजक आठवणींचा चित्रपट उभा केला. पल्लवी पास्ते यांनी तर आपल्या सुरेल व सुमधुर आवाजात गीत गायन करून कार्यक्रमात बहारदारपणा आणला. त्याचप्रमाणे या स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी या बॅचमधील रंजना पारधी, कांचन पास्ते,संध्या निकम, सुमन सावंत ,सुवर्णा नेवगी,मंगल पास्ते, छाया राऊळ, दीप्ती मालवणकर, विनोद पास्ते,राजन घाडी,शांताराम नाईक, हेमंत राणे,रणजीत राऊळ,प्रवीण नाईक,नरेंद्र पारधी,शैलेश पास्ते, गोविंद राऊळ,अजित सावंत, संजय सावंत, देवेंद्र गुंजाळ, प्रशांत राऊळ, नितीन कुडतरकर शैलेश नाईक आदी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले.
या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचकडून शाळेच्या ऋणांतून उतराई होण्याचा एक अल्पसा प्रयत्न म्हणून ‘मल्टीमीडिया स्पीकर व माईक’ अशी मोलाची व उपयुक्त भेटवस्तू प्रशालेला देण्यात आली. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (परीक्षा पॅड) व खाऊ वितरित करण्यात आले. यावेळी स्नेहभोजन व माजी विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी गप्पागोष्टी, हितगुज व गायन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी नरेंद्र गावडे व सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोना लसीवर संशोधन करणारे संशोधक डॉ. प्रमोद पुजारी यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किशोर वालावलकर यांनी मानले.

Exit mobile version