सिंधुदुर्गातील रुग्णांना होणार याचा जास्त फायदा
सावंतवाडी, दि.२३ : गोवा-बांबुळीच्या धर्तीवर पेडणे-तूये येथे उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल जानेवारीपासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. याचा विशेष करून फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, असे मत पेडणे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केला. या हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबुळी “सेकंड पार्ट” असा दर्जा त्या हाॅस्पिटलला देण्यात आला आहे. त्यामुळे बांबुळीला होणारे सर्व उपचार या ठिकाणी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पणजी-गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सावंतवाडी पत्रकार संघाच्या कार्यक्रमा दरम्यान आरोलकर दीड वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. याबाबत श्री. आरोलकर यांना विचारले असता ते म्हणाले पेडणे तुये येथे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गोवा-बांबुळीच्या धर्तीवर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना हे अत्यंत जवळचे हॉस्पिटल ठरणार आहे. त्यामुळे आता उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळीत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलचा शुभारंभ जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे.