Site icon Kokandarshan

फळपीक विमा योजना कवच भरपाई पासून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी वंचित राहण्याची शक्यता…

तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू: रुपेश राऊळ

सावंतवाडी, दि.१४ : तालुक्यातील शेतकरी फळ पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विम्याचे कवच मिळाले पण अजून पैसे जमा झाले नाहीत. तात्काळ पैसे विमा कंपनीने जमा केले नाहीत तर अधिकाऱ्यांची दिवाळी गोड तर शेतकऱ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केली. तसे झाले तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

वेंगुर्ले तालुक्याला जवळपास विमा कवचा नुसार नुकसान भरपाई मिळू लागलीय. पण सावंतवाडी तालुक्यातील ९० टक्के शेतकरी वंचित आहेत. बँका, कृषी,विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची दिवाळी गोड गेली पण शेतकऱ्यांना विमा योजनेच्या भरपाई पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे. तशीच चिंता आपल्याकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी सुशेगाद आहेत. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे पण त्यांना देणंघेणं नाही. बँक मध्ये काही प्रमाणात पैसा जमा होवूनही राजकारण केले जात आहे. बँक मध्ये पैसा जमा होवूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कोणाचे हात कशाला थरथरत आहेत.काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करायचा सोडून स्थानिक आमदार मंत्री असूनही ते झोपले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणीकडे आमदारांचे लक्ष नाही. त्यामुळे विमा कंपनी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी व संबंधितांचे फावले आहे त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असे राऊळ यांनी म्हणाले.

फळपीक विमा योजना कवच योजनेची भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा रूपेश राऊळ यांनी दिला आहे.

Exit mobile version