अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.. अजित सांगेलकर
सावंतवाडी,दि.२७: येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात असलेली संरक्षक भिंत जीर्ण झालेली असून ती रुग्णालयाच्या इमारतीच्या बाजूने कलंडली आहे.
या मार्गाने दिवसातून हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ये – जा करत असतात. अशा परिस्थितीत दुर्दैवाने जर ही भिंत कोसळली तर जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्राहक मंच संरक्षण कक्ष शहर प्रमुख अजित सांगेलकर यांनी पाहणी करत ही बाब वैद्यकीय अधिकारी एवाळे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सगरे यांच्या लक्षात आणून दिली.
यावेळी सांगेलकर यांनी जीर्ण झालेल्या भिंतीच्या परिसरातील मार्ग बंद करून पर्यायी दुसऱ्या वाटेने रुग्णांना जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच जीर्ण झालेली भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सांगेलकर यांनी प्रशासनाला दिला.