बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत चर्चा
सिंधुदुर्ग,दि.२९ : सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्यावतीने संविधानदिनानिमित समता पर्व २०२२ उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सामाजिक न्याय विभाग सिंधुदुर्गनगरी येथे सामाजिक न्यायाची नवी दिशा या विषयावर पत्रकारांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सामाजिक न्याय विभागाच्या योजना, जात पडताळणीबाबतचे विविध प्रश्नांविषयी समाजकल्याण व जातपडताळणी विभागाकडून पत्रकारांना महिती देण्यात आली.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, जातपडताळणी उपायुक्त प्रमोद जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वांलावलकर, लेखाधिकारी भालचंद्र कापडी, समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, चित्रांगी तोरसकर, सुनील बागुल, संतोष परूळेकर, धनलता चव्हाण, शिल्पा आमरे, सृष्टी रेगाळे, संग्राम कासले, आरती सावंत, संदेश कलालकर, धोंडी कलिंगण आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यता आली.
तीन वर्षाचा आढावा माहिती पुस्तकातून मिळणार
यावेळी पत्रकारांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजना किती लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या? याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. यावर सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी सामाजिक न्याय विभागाने गेल्या तीन वर्षात ज्या योजना राबविल्या आहेत. त्याचा संपूर्ण माहिती सामाजिक न्याय विभागाकडे आहे. योजनांचा लाभ किती लाभार्थ्याना मिळाला? शिष्यवृती योजनांचा लाभ किती विद्याथ्यांना मिळाला? याची तीन वर्षातील संपूर्ण आकडेवारीचा आढावा माहिती पुस्तकातून येण्यात घेणार आहे.
वसतीगृहामध्ये सोयी सुविधांसाठी कटीबद्ध
पत्रकारांनी जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतीगृहांची सद्यस्थिती कशी आहे? वसतीगृहात सोयी सुविधा उपलब्ध आहेत का? याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील वसतीगृहांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येत असून वसतीगृहामध्ये सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सावंतवाडी वसतीगृहासंदर्भात ज्या समस्या आहेत. त्या समस्था लवकरात लवकर दूर करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुत्रसंचालन आनंद कर्पे यांनी केले.