Site icon Kokandarshan

राज्यातील १०००० पत्रकारांची करणार आरोग्य तपासणी… एस.एम.देशमुख

३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन..

सिंधुदुर्ग, दि.२८ : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील १०,००० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने केला आहे.. हे अभियान यशस्वी झाले तर हा विश्वविक्रम होऊ शकतो..तेव्हा राज्यातील सर्व जिल्हा, तालुका संघांनी सहकार्य करावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका संघांनी ३ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीरं घेऊन परिषदेचा संकल्प पूर्णत्वास न्यावा असे आवाहन एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई यांनी केले आहे..याबाबतचे प्रसिद्धीपत्रक राज्य पत्रकार परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख हरिश्चंद्र पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे
३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. काकासाहेब लिमये हे परिषदेचे पहिले अध्यक्ष होते.. तेव्हा पासून गेली ८३ वर्षे परिषदेची अखंड वाटचाल सुरू आहे.. येत्या ३ डिसेंबर रोजी परिषद ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी राज्यात *पत्रकार आरोग्य तपासणी दिन* म्हणून साजरा केला जातो.. या दिवशी राज्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते.. असा उपक्रम राबविणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव पत्रकार संघटना आहे.. यावर्षी परिषदेने राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प सोडला आहे..

पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते..वेळीच काळजी न घेतल्यानं आणि दुर्लक्ष केल्याने छोटे आजार नंतर बळावत जातात आणि मग हाताबाहेर जातात हे टाळण्यासाठी परिषद आरोग्य तपासणी शिबिरं घेते.. यावर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्यावतीने एकाच दिवशी ही शिबीरं आयोजित करण्यात येणार आहेत.. स्थानिक पातळीवर रोटरी, लायन्स क्लब तसेच स्थानिक डॉक्टर मित्रांच्या मदतीने ही शिबिरं घ्यावीत आणि पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.. या तपासणीतून कोणी गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाल्यास मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील सरकारी आरोग्य कक्ष तसेच परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख दीपक कैतके यांच्या माध्यमातून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Exit mobile version