कणकवली,दि.०३: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. सरकारच्या या अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विरोधात उद्या ४ सप्टेंबर रोजी कणकवली येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय मोर्चाचे आयोजन मराठा समाज बांधवानी कलेले आहे. या सरकार विरोधातील निषेध मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा आहे.तसेच ५ सप्टेंबर रोजी तालुका स्तरावर आणि ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने होणाऱ्या ‘जवाब दो’ आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा राहील. ज्या ज्या वेळी सरकार जनतेवर अन्याय करेल त्या त्या वेळी काँग्रेस पक्ष हा अन्याच्या विरोधात जनतेसोबत उभा राहिल असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी म्हटले आहे.