Site icon Kokandarshan

सावंतवाडीत आता १५ व १६ ऑगस्ट रोजी रंगणार फुटबॉलचा “थरार”…

संदीप गावडेंचे आयोजन; जुन्याजाणत्या खेळाडू, पंच, शिक्षकांचा होणार सन्मान…

सावंतवाडी,दि.१४: भाजपाचे युवा नेते संदीप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आता १५ व १६ ऑगस्ट अशी दोन दिवस खेळवली जाणार आहे. स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ३० हून अधिक संघ सहभागी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या स्पर्धेदरम्यान जिल्ह्यातील फुटबॉल खेळणाऱ्या जुन्याजाणत्या खेळाडू, पंच व फुटबाॅल खेळाडू घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिकेत आसोलकर यांनी दिली.
ही स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला सावंतवाडी पालिकेच्या जिमखाना मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार तर व्दितीय पारितोषिक २५ हजार देण्यात येणार आहे. त्याच बरोबर वैयक्तिक ५ हजार रुपयाची पारितोषिक देण्यात येणार आहेत. आत्ता पर्यंत या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरसह गोवा राज्यातील अनेक संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा २ दिवस खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फुटबॉल खेळात आपला सहभाग दर्शविणाऱ्या आणि नवोदित खेळाडू घडविण्यासाठी परिश्रम घेणारे क्रीडा शिक्षक, पंच आणि जुन्याजाणत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक, पंच व खेळाडूंनी आपली अधिक माहिती चैतन्य सावंत ९०११२३४७७२ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version