सावंतवाडी, दि. ०८ : शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावी परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे सदर कार्यक्रम रद्द केला होता. आता क्रांतीदिनी ९ रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
या गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा मराठी या विषयात ९८ किंवा ९९ गुण पटकावले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील ज्या शाळांचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना गौरविण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग मराठी अध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे.