होडावडा पुल पाण्याखाली : वाहतूक ठप्प
सावंतवाडी,दि.२०: दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील होडावडा पूल पाण्याखाली गेले. तर तळवडे बाजारेठांमध्ये पाणी घुसले. काहीं दुकानामध्ये पाणी शिरले. परिणामी पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पाणी येते. दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या होडावडा पुलाची उंची वाढविण्याची मागणी वारंवार होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उपस्थित वाहनचालकांनी दिल्या.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने काही ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर पाणथळ शेतीची कामे खोळंबली आहेत. मुसळधार पावसामुळे पुलावर पाणी आल्याने होडावडासह सावंतवाडी वेंगुर्ले जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी कोंडी केली. पाणी कमी होईपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागली.