याचे सारे श्रेय तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना.. आंबोली शि.विभाग प्रमुख बबन गावडे
सावंतवाडी,दि.०४: तालुक्यातील आंबोली,गेळे व चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावर ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या सततच्या आक्रोशामुळे शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया आंबोली शिवसेना विभागप्रमुख बबन गावडे यांनी दिली.
आंबोली, गेळे व चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावर सतत गावातील प्रमुख ग्रामस्थ सुद्धा पाठपुरावा करत होते.आम्ही ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलक भूमिकाही घेतली होती असे गावडे यांनी सांगितले.
बबन गावडे म्हणाले, आंबोली व गेळे येथील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावर शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला आहे त्याचे श्रेय ठाकरे शिवसेनेला जाते. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदा घेऊन सातत्याने सरकार, आमदार दीपक केसरकर व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन केली यांचे पीतळ उघडे पाडले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात लोक विरोधात जातील म्हणून भिजत घोंगडे पडलेल्या प्रश्नाची उकल आताच्या सरकारने केली. त्यामुळे त्याचे खरे श्रेय ठाकरे शिवसेना व तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना जाते. अशी प्रतिक्रिया गावडे यांनी कोकण दर्शन डिजिटल मीडिया ला दिली आहे.