उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश
सावंतवाडी,दि.३०: येथील मळेवाड कोंडूरे गावाचे तलाठी हे पद गेली दीड वर्ष रिक्त होते.या पदाचा मळगाव तलाठी सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी म्हणून कार्यभार सुपूर्द करण्यात आला होता.कायमस्वरूपी तलाठी नसल्याने याठिकाणी शेतकरी व जमीनधारक यांचे फार मोठे हाल होत होते.मळेवाड कोंडुरे करीता स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठी मिळावा अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे केली होती.या मागणीचा प्रांताधिकारी यांनी विचार करून मळेवाड कोंडुरे गावासाठी कायमस्वरूपी तलाठी म्हणून अनुजा भास्कर यांची नेमणूक केली आहे.यामुळे १ जुलैपासून मळेवाड कोंडुरे तलाठी म्हणून अनुजा भास्कर ह्या रुजू होणार आहेत.प्रांताधिकारी यांनी कायमस्वरूपी मळेवाड कोंडुरे गावाला तलाठी दिल्याने शेतकरी व ग्रामस्थानी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.