सावंतवाडी,दि.२८: येथील रेल्वे टर्मिनसचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि रेल्वे स्टेशनवर जास्तीत जास्त गाड्या थांबाव्यात याबाबत विविध संघटना, पदाधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी दिल्ली येथे खासदार शरदचंद्रजी पवार यांची भेट घेत याबाबत सर्व मागण्यांचे सविस्तर पत्र दिले.
या पत्रात रेल्वे टर्मिनसच्या कामाची पार्श्वभूमी , सद्यस्थिती व रेल्वे स्टेशन वरील गाड्या न थांबल्यामुळे होत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींबाबत माहिती दिली. खा. शरद पवार यांनी सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेत हे काम अद्याप पूर्ण न होण्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी तसेच स्टेशनवर करावे लागणाऱ्या विविध उपायोजना, गाड्यांना थांबे देण्याबाबत सर्व गोष्टींची माहिती घेतली. तसेच या प्रश्नात स्वतः जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे देखील खा. शरद पवार यांनी सांगितले.