ब्रिस्बेन, 31 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला यंदा मात्र अनेक खस्ता खाव्या लागत असल्याचं दिसतंय. आज ऑस्ट्रेलियानं आयर्लंडला 42 धावांनी हरवलं. पण आयरिश संघानं ब्रिस्बेनच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला चांगलच झुंजवलं. कॅप्टन अॅरॉन फिंचच्या (63) दमदार अर्धशतकाच्याा जोरावर ऑस्ट्रेलियानं 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण त्याचा पाठलाग करताना आयर्लंड 137 धावात आटोपली. पण आयर्लंडचा विकेट किपर बॅट्समन लॉर्कन टकरनं कांगारुंना जोरदार टक्कर देत कांगारुंना घाम फोडला होता.
टकरची झुंजार खेळी
180 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणासमोर आयर्लंडची दाणादाण उडाली. कमिन्स (2), स्टार्क (2), झॅम्पा (2) आणि मॅक्सवेलनं आयरिश फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. पण विकेट किपर बॅट्समन लॉर्कन टकरनं एका बाजूनं शेवटपर्यंत जोरदार संघर्ष केला. त्यानं नाबाद 71 धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूनं आयर्लंडच्या एकाही फलंदाजाकडून त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे टकरची झुंजार खेळी व्यर्थ ठरली.